चित्रकार गायतोंडे यान्ची मुलाखत....(2)
१९९८ च्या अनुष्टुभ दिवाळी अंकातील चित्रकार गायतोंडे यान्ची नीतीन दादरावाला यान्नी घेतलेली मुलाखत....
(चिन्हने २००६ साली प्रकाशित केलेल्या 'गायतोंडे विशेषांक' या वार्षिक अंकात पुनर्प्रकाशित झालेली हि मुलाखत मी येथे जशीच्या तशी टाईप केली आहे याची कृपया नोंद घ्यावी.)
|
(Report courtesy Photographer: Dhiraj Singh/Bloomberg) |
वासुदेव गायतोंडे यान्चा जन्म १९२४ मध्ये नागपुर येथे झाला. १९४८ साली 'सर जे. जे. स्कुल ऑफ़ आर्ट' मधुन चित्रकलेचा डिप्लोमा घेतला. त्यान्ना एका वर्षाची फ़ेलोशीपही मिळाली, परन्तु चित्रकला शिकविण्यात त्यान्चे मन रमले नाही. प्रोग्रेसिव आर्टीस्ट ग्रुप आणि बॉम्बे ग्रुप अश...ा दोन्ही ग्रुपशी त्यान्चा सुरुवातीला संबंध आला; तरीही ते प्रोग्रेसिव आर्टीस्ट ग्रुपचे म्हणुनच अधिक ओळखले जातात. १९६४-६५ मध्ये त्यान्ना 'रॉकफ़ेलर फ़ेलोशीप' मिळाली. त्या अंतर्गत त्यान्नी अमेरिकेत न्युयॉर्क येथे काही महीने राहून काम केले. तेथुन परतताना त्यान्नी काही दिवस युरोप व जपान मध्ये घालवले. युरोप मधील समकालीन चित्रकलेशी त्यान्ची ओळख झाली. जपानमध्ये त्यान्ची 'झेन' तत्वज्ञानाविषयीची ओळख आणि ओढ वाढली. त्यान्नी झेन गार्डन्सना भेट दिली. १९७१ साली भारत सरकारने त्यान्ना 'पद्मश्री' हा किताब बहाल करुन त्यान्चा गौरव केला. देशविदेशातील अनेक चित्रसंग्राहकान्कडे व म्युझियम्स मध्ये गायतोंडे यान्च्या कलाकृती आहेत.
गेल्या पन्नास वर्षामध्ये 'गायतोंडे' हे नाव भारतीय चित्रकलेच्या जगात एक अख्यायीका बनून गेले आहे. ज्ञानेश्वर नाडकर्णी म्हणतात त्याप्रमाणे ते 'चित्रकारान्चे चित्रकार' आहेत. अनेकान्नी त्यान्च्या मुलाखती घेउन त्यान्ना जाणुन घेण्याचा प्रयत्न केला आहे. नरेन्द्र डेन्गळे, ज्ञानेश्वर नाडकर्णी, प्रमोद गणपत्ये, एस.आय.क्लर्क,अव्यक्त दास अशा अनेकान्शी गेल्या पन्नास वर्षात वेळोवेळी केलेल्या संवादातून गायतोंडे यान्च्याच शब्दात त्यान्चा परिचय करुन घेउ.
"माझे लहानपण गोव्यातील एका लहानश्या खेड्यात गेले. गायतोंडे कुटुम्बियान्चीच ती एक वसाहत. भातशेतीने वेढलेली. त्यातील एक गायतोंडे कुटुम्बीय तेथील देवळाच्या भिन्तीवर चित्रे काढायचा, कदाचित तेच बघुन मी चित्रकलेकडे ओढला गेलो असेन. त्याच सुमारास मी चित्रे काढुही लागलो आणि माझ्या लक्षात आले की आपल्यालाही चित्रं काढणे जमते आहे. विद्यार्थीदशेतच,पुढे मुम्बईत आल्यावर म्युनिसिपल शाळेत जाऊ लागलो आणि थोड्याच दिवसात आर्ट ग्यालरीत प्रदर्शने पाहू लागलो. घरुन अर्थात फ़ारसे प्रोत्साहन कधी नव्हतेच. वडिल तापट आणि आई शान्त, पारंपारिक वृत्तीची. 'वाटेल त्या' मुलान्मध्ये मिसळायला परवानगी नसे आणि आसपास चान्गली मुलेही विरळाच. आपसूकच एकटा पडलो. वाचनाची गोडी लागली.
'जे.जे.'चा परिसर भव्य. ऊन्च सिलीन्ग, ऊन्च खिडक्या, झाडे. प्रत्येक वर्गावर एक एक शिक्षक असे. अहिवासी हे आम्हाला एनॉटॉमी शिकवायचे. त्यान्चे आमच्या कामाकडे बारीक लक्ष असे. निसर्गचित्रे, पोर्टेट शिकवली गेली ती Statues and figures वर काम केल्यावर. दर शनिवारी आम्ही कॉलेजबाहेर पडून रेखाटने करत असू. मी शिकत होतो त्यासाठी मला कमवावेही लागत होते. कोठे शिकवणी कर, कोठे सुटीत काम कर असे चाले. 'जे.जे.' मध्ये मला शिष्यवृत्ती होती. पण सर्वाधिक शिक्षण झाले ते आम्हा विद्यार्थ्यान्चे एकमेकान्कडून. आम्ही परस्परान्कडून जे शिकलो त्याला तोड नाही. सर्वान्ना चित्रकलेविषयी कुठेतरी पोटतिडीक होती, शिकायचा उत्साह होता. कलेवर प्रेम होते... 'पळशीकर' म्हणजे भारतीय चित्रकलेतील महत्वाचा बिन्दू. त्यान्च्या चित्रकलेने एक वैशिष्ट्यपूर्ण पल्ला गाठला होता. त्यान्ची चित्रकला खर्या अर्थाने 'भारतीय आधुनिक चित्रकला' म्हटली जावी. सबंध 'जे.जे.' चे विद्यार्थी त्यान्च्या प्रभावाखाली आले. आणि याच काळात आम्ही आधुनिक चित्रकलेकडे येऊन ठेपलो होतो...
...शाळेमध्ये होतो तेन्व्हाच ध्यानात आले होते की आपण चान्गले चित्र काढतो, त्यामुळे चित्रकलेखेरीज इतर पर्याय पुढे आलेच नाहीत आणि म्हणुनच चित्रकला माझ्या आयुष्याचा केन्द्रबिन्दु ठरला.पण माझी रंगाची जाणिव तेवढी सुस्पष्ट नव्हती. डोळ्यानी जे दिसायचे ते मी रंगवू शके इतकेच. पण डोळ्यान्पुढे नाही आणि ज्याची जाणिव असे ते मी रंगात उतरवू शकत नव्हतो. संकल्पनात्मक, आकृतीबद्ध आणि अमुर्त, सर्वच त्यामुळे अवघड जात होते.
.... भारतीय लघुचित्रं आमच्या अभ्यासक्रमाचा एक भाग होता. मी मिनिएचर्सचे(लघुचित्रं) चक्क कित्ते गिरवले, त्यातून मात्र मी रंगाविषयी अधिकाधिक जागरुक बनलो. त्यान्च्याकडे नव्याने पहायला शिकलो. नंतर लघुचित्रामधील आकृतीबंध गाळून टाकून त्यातील प्रमाणबद्धता, रचनासूत्र, रंगान्चे संघटन आणि भाव मात्र ठेवला. कदाचित हीच माझ्या आधुनिक चित्रकलेची सुरुवात असावी...
....मी स्वभावतःच थोडा अलिप्त. एकान्तप्रिय आणि मितभाषी. आमच्या ग्रुपमध्ये मुद्दाम 'भारतीय शैली' बेतावी असे कधीच जाणवले नाही. चित्रकलेकडे माझ्या मित्रान्पेक्षा वेगळ्याच दृष्टिस पहात होतो. मी 'असा आहे' याची कारणमीमान्सा देण्याची गरज मला भासत नव्हती. म्हणूनच भारतीय मिनिएचर्स, पॉल क्ली आणि झेन माझी बंदीस्त क्षेत्रे न ठरता, मीच पलिकडे गेलो. या अमुर्ततेत मी स्वैर विहार करु शकत होतो. त्यात मला अखंड स्वातंत्र्याची जाणीव लाभली. माझी चित्रकला माझ्या शैलीची गुलाम न बनता, शैली व चित्रकला एकमेकास पुरक ठरल्या. माझी चित्रं Polychromatic नसून Monochromatic असतात. एका मुख्य रंगाच्या अनुषंगाने इतर रंगान्ची योजना होत असते. उदाहरणार्थ, हिरवा रंग वापरता वापरता क्यानव्हासवर त्या हिरव्या रंगाचे रुप हळूहळू साकार व्हावयास लागते. इतर रंगही मग त्यामध्ये कधी कधी येतात ते पुन्हा त्याच हिरव्या रंगाच शोध घेत....
'पॉल क्ली' मधून 'झेन'मध्ये आपण केन्व्हा शिरलो हेच कळले नाही; पण हे नक्की की 'झेन'शी ओळख होताना माझ्यात 'क्ली' नव्हता. या स्थित्यंतरात कुठलेच क्लेष नव्हते. एक मात्र खरे की आता एका विविक्षीत संकल्प्नेतून चित्रणाची आवश्यकताच वाटेनाशी झाली. एक विलक्षण मोकळेपणा आला. त्यातूनच रंग चित्रण घडू लागले...
चित्रकलेसाठी, तिच्या आस्वादासाठी आणि निर्मितीसाठी सदैव जागरुकतेची आवश्यकता असते. आपण सतत सर्जनशील असतोच. स्वयंपाक करताना, काम करताना परंतु नेहमीच्या जीवनात ही सर्जनशीलता पुन: पुन्हा एकाच चक्रात फसून जाते. ह्याच क्रियेने खर्या आर्थाने सर्जनशील व्हायला हवे. it is a constantly meditative action. रंगचित्रणाच्या प्रक्रियेत विचाराला थारा नसतो. सबंध शरिर,मन एक संघटीत झालेले असते...'झेन' म्हणजे एका क्षणात चित्रकार,रंग व कैनव्हास या सर्वान्ची युती होते. सर्व समलय होते. संपुर्ण सृष्टीच जणू रंगकामात भाग घेते...
जाणीवपूर्वक पुनरावर्तन टाळण्याची मला गरज कधी वाटलीच नाही. कारण, पुर्वीच्या रंग स्वरुपाचे नव्या चित्रणावेळी मला पुर्ण विस्मरण असते. तो रिकामा कैनव्हास मला इतका आवड्तो की केन्व्हा केन्व्हा मी त्यास पुष्कळ वेळ न्याहाळत बसलेलो आहे.! त्याचा आकार लहान मोठा झाला तरी रंग पद्धती व तंत्र बदलते जसे मोठ्या घरातून लहान घरात यावे व सर्व कुटुम्बियान्ची हालचाल पालटावी तसे होते. स्वत:च्या रंग चित्रणाची पद्धत मात्र उमजावी लागते, मग हालचालीत डौल येतो, कोठेही, कसाही कैनव्हासवर विहार करता येतो. जेथे अमुक एक असे उद्धिष्ट-ध्येय नाही तेथे कलेचा 'विकास' न होता त्याची उत्क्रान्ती होत असते. वाढ : उत्क्रान्ती : कला चित्रण : चित्रकार यान्चा प्रवास बरोबरीचा असतो. तेथे विकासाचा संबंध येत नाही...
माझ्या चित्रात रंग हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. एका रंगाबरोबर दुसरा रंग आलाच तर तो पुरक म्हणुनच येतो. माझी चित्रे ही प्रामुख्याने अमुर्त असली तरी हा बदल हळूहळू झाला. चित्रामधील मानवाकृती मला अतिशय जाचक, बंधनकारक वाटू लागली. हळूहळू आकृती नष्ट होउन तिची जागा आकारान्नी घेतली. मी प्रामुख्याने लाल, निळा व पिवळा य तीन मुल रंगातून चित्र काढतो किन्वा ह्यान्ची सरमिसळ करून माझ्या चित्राची सुरूवात रंगानेच होते. मी रंगाला स्पर्श करतो व क्यानव्हासवर मुक्तपणे वाहू देतो. रंग आणि चित्रकार ह्यान्च्या परस्परसंबंधाने, सुसंवादाने चित्र घडत जातं. विचार करूनच काम होतं असं नाही. मी करत गेलो आणि होत गेलं. इतकं नैसर्गिक माझं काम होत गेलं. माझ्यावरही सुरुवातीला काही प्रभाव पडले पण ते पुढे टिकले नाहीत. मी माझ्याच प्रभावातून मुक्त झालो नाही.
समकालीन कलेविषयची मला काही सान्गता येणार नाही. मी गेली २० वर्ष कुठेही बाहेर गेलेलो नही. माझा संबंध कलेशी नाही फ़क्त माझ्या पेन्टीन्गशी आहे. पुर्वी माझ्या अवती भोवती खुप गर्दी होती पण मी एकटा एकटाच असे. हळूहळू मी माझ्यतील 'मी'च्या अधिकाधिक जवळ जाऊ लागलो. गर्दी हळूहळू नाहीशी झाली. परीघ सुटला. केन्द्राच्या दिशेने प्रवास सुरु झाला. आता फ़क्त 'मी' आहे त्यामुळे बाहेरचं जग माझ्यापर्यन्त येऊ शकत नाही. अंधार आहे म्हणून प्रकाशाचा शोध आहे पण एक काडी पेटवली की 'दृष्टी'ला दिसू लागतं. वस्तू सर्व आधी होत्या तिथेच असतात पण मध्यंतरीच्या अंधारामुळे दिसत नव्हत्या. 'vision' असली की सर्व स्वच्छ दिसू लागतं.
दोन पेन्टीन्गच्या मधली सर्वात महत्वाची गोष्ट कुठली असली तर आरामात वाट पाहणं. आयुष्यात कसलीच कधी महत्वाकान्क्षा नव्हती. बस जगत गेलो काम होत गेलं.
मी माझ्यातल्या 'मी'ला भेटलो हेच माझं मिळवणं. प्रत्येक चित्रं हे चित्रकारचे सेल्फ़पोर्ट्रेट असतं.
(Report courtesy unknown google)