प्रतिभावंत भारतीय चित्रकार श्री. राजेंद्र पाटील "पारा" यांचे एकल प्रदर्शन सोलो शो- 'इनबिटविन होप अँड फीअर' सध्या जहांगीर आर्ट गॅलरीत आयोजित करण्यात आले आहे। 8 ते 14 ऑक्टोबर 2019 पर्यंत हे प्रदर्शन कला रसिकांसाठी आणि सामान्य जनतेसाठी खुले आहे। आवर्जून पहावे असे हे प्रदर्शन आहे। तेव्हा अवश्य एकदा....
माणूस हा समाजशील प्राणी आहे असं अरिसटोटल Aristotle म्हणतो। पण तो समाजशील होण्याची प्रक्रिया ही क्लिष्ट आहे। व्यक्ती, कुटुंब ते समाज अश्या स्तरावर वावरताना त्याला नीतिनियमांचे बंधन असते। समाज हा कळपांचा बनलेला असतो, समूहाचा बनलेला असतो। कळपांचा, समूहाचा त्यांचा स्वतः चा एक स्वतंत्र विचार असतो आणि समविचारी डोकी एकत्र येऊन ग्रुप बनतो। समाज जीवनात राहताना या समूहात, कळपात आचार विचारात घर्षण व्हायला सुरुवात होते। मतभेदांचे रूपांतर हिंसेत होते। यासाठी शस्त्रांच्या निर्मिती ची गरज तयार होते। चढाओढ, स्पर्धा यातून मानवी अस्तित्वालाच धोका तयार होतो। ही प्रक्रिया मानवाच्या अस्तित्वापासून आजपर्यंत चालू आहे आणि एका विशेष महत्वाच्या टप्प्यावर, वळणावर येऊन आपण सर्व पोहोचलो आहोत। जागतिक पातळीवर भीतीचे मळभ अधिक ठळक होत आहे आणि हे सिरियसली विचार करण्याची गरज आहे। हाच धागा चित्रकार राजेंद्र पाटील यांनी तब्बल तीन दशकं समर्थ पणे पकडला आहे। आशा आणि भीती या मानवी आदीम प्रेरणांना, संवेदनशील भावनांना आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून परिस स्पर्शाचा अनुभव देतानाच विचार ही करायला चित्रकार "पारा" पाटील आपल्याला प्रवृत्त करतात। ही या प्रदर्शनाची जमेची बाजू आहे।
चित्रांचा आणि शिल्पांचा सौदर्यात्मक अनुभव रसिकांना होतो। शस्त्रांचे वेगवेगळे अमूर्त केवल आकार हे चित्रकाराच्या बुद्धीमत्तेची चुणूक दर्शविते। कॅनव्हास ला असलेल्या विशिष्ट पोतामुळे विषय अधिक गहनपणे ठळक होत मनावर ठसतो। रंगछटांचा सुंदर मिलाफ चित्राला विलोभनीय बनवतात। त्रिमित शिल्पातून आणि इन्स्टलेशन मधून रसिक हे विषयाशी पूर्ण पणे समरस होतात। काही चित्र ही डिझिटल माध्यमात आहेत। तंत्रज्ञानातील आधुनिक टूल्सचा प्रभावी अचूक वापर ही "पारा" आपल्या कलाकृतीत करतात हे विशेष।
"पारा" पाटील यांच्या कलाकृतींचे समीक्षण करताना केवळ कलात्मक- सौन्दर्यात्मक बाजूने आपल्याला विचार करता येत नाही। सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि कला राजकारण या पातळीवरचा त्यांचा संघर्ष ही आपल्याला विचारात घ्यावा लागतो। "पारा" पाटलांच्या एकूण व्यक्तिमत्वाचा आपल्याला विचार करावा लागतो। मूळात "पारा" हे स्वाभिमानी आणि प्रामाणिक कलावंत आहेत। विध्यार्थी दशेतच संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून त्यांनी त्यांची प्रगल्भता आणि सशक्त कलाजाणीव सिद्ध केले आहे। विविध पुरस्कार, मानसन्मान आपल्या प्रतिभेच्या जोरावर मिळवून आजही त्याच दिमाखात त्यांची कला निर्मिती चालू आहे। कुठल्याही राजकीय पक्षाच्या सावलीची त्यांनी कधीच अभिलाषा बाळगली नाही। आणि म्हणूनच त्यांचा हा कलात्मक प्रवास हा संघर्षमय आहे। शुद्ध आहे।
- राहुल धोंडीराम थोरात