Monday 3 July 2017

Artist Subhash Gondhle's (SuGo) mesmerising European tour.




युरोपहून येऊन चार  दिवस झाले तरी अद्याप रात्री झोपेत युरोपमध्येच असल्याची स्वप्ने पडताहेत. युरोपचे सुंदर भूत डोक्यावरून उतरायला तयार नाही. त्याने पार झपाटून टाकलंय अशी अवस्था झाली आहे. याला कारण युरोप खरोखर तसेच आहे. माझ्यासारख्या चित्रकाराला किंवा कुणाही कलाप्रेमी पर्यटकाला मोहून टाकणारी कलात्मकता, सौंदर्य स्वच्छता आपणास सर्वत्र आढळते.
सर जे. जे. कलामहाविद्यालयात शिकत असताना कलेचा अभ्यास करताना युरोममधील विविध शहरांचा, देशांचा परिचय झाला होता. नंतर युरोपविषयी बऱ्याचदा वाचनात आले होते. त्यामुळे युरोपबद्दल मनात खूप उत्सुकता होतीच, कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला नोकरी, नंतर लग्न, नंतर स्वतंत्र व्यवसाय, मुले, त्यांचे शिक्षण असे संसारात गुंतून पडलेलो. युरोपला जाण्याची इच्छा या सर्व व्यापात राहून गेलेली, पण अशातच पुण्यातील माझे साडू नरेंद्र यांचा फोन आली की एका टुरकंपनीसोबत आपण युरोपला येणार का?  टूरची तारीख नेहरू सेंटरमधील माझ्या चित्रप्रदर्शनानंतर लगेचच तीन दिवसांनी असल्याने माझी थोडी धावपळ होणार होती, तरी पण मी होकार कळवला. एकीकडे चित्रप्रदर्शनाची तयारी, चित्र, फ्रेमींग, कॅटलॉग, प्रिंटींग, निमंत्रण पत्रिका इत्यादी बनवणे, वाटणे, त्यातच टुरची तयारी, पासपोर्ट फोटो, असेच हवे तसेच नकोपासून पासपोर्ट बँकांच्या पासबूकच्या झेरॉक्स, आय.टी.रिटर्नच्या झेरॉक्स, हे सबमीट करा, ते करा, नंतर टूरकंपनीकडून विविध सूचनासर्व आटोपल्यावर, चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन ज्या दिवशी संध्याकाळी होते, त्याच दिवशी व्हिसा कार्यालयात बोलावले होते. तेथे जाऊन सोपस्कार पूर्ण केले, नंतर नेहरू सेंटरमधील माझ्या चित्रप्रदर्शनात बीझी झालो. टूरची खरेदी राहूनच गेलेली. पत्नी सोबत येणार असल्याने माझा थोडा व्याप कमी झाला. बॅगा भरणे, त्यावर नावाचे स्टीकर्स, वेगळ्या रंगाच्या रिबिन्स बांधणे, इत्यादी कामे करताना जीव अक्षरश: मेताकुटीला येतो. हे सर्व आटोपून निघालो. संध्याकाळी छत्रपती शिवाजी आंतरदेशीय विमानतळावर पोहोचलो. आधीचे सर्व सोपस्कार आटोपून जेट एअरवेजच्या विमानात स्थानापन्न झालो. तोपर्यंत रात्रीचे दोन वाजले होते. .३० वाजता विमानाने उड्डाण केले थोड्याच वेळात मला झोप लागली. दहा तासांचा हवाई प्रवास करून सकाळी युरोपमधील नेदरलँड (जुने नाव हॉलंड)च्या अॅमस्टरडॅम शहराच्या शिपॉल विमानतळावर उतरलो.
विमानतळाबाहेर पडताच आल्हाददायक गारवा जाणवला गेल्या महिन्याभरातील थकवा ताण एका क्षणात नाहीसा झाला. प्रसन्न वाटले. आम्ही ३३ पर्यटक होतो. आम्हा सर्व पर्यटकांसाठी बस तयारच होती. टूर गाईडच्या सूचना सुरूच होत्या. त्याने प्रथम सांगितले बसचालकाला ड्रायव्हर म्हणायचे नाही किंवा त्याला अरेतुरे करायचे नाही, तर त्यालाकॅप्टनम्हणायचेही बस एल.डी.सी. म्हणजे लाँग डिस्टन्स कोच आहे, संपूर्ण युरोप आपण याच बसने फिरणार आहोत नेमून दिलेल्याच सीटवर बसायचे आहेवगैरे वगैरे. आम्ही स्थानापन्न झालो प्रवास सुरू झाला. बस अतिशय आरामदायी, वातानुकूलीत काचेच्या मोठ्या खिडक्या असलेली अशी असल्याने शहरांतून फिरताना आजूबाजूचे रस्ते, इमारती, निसर्ग बघणे फोटो काढणे सोयीचे झाले.
बाहेरचे दृश्य पाहताना अॅमस्टरडॅम या शहराचे जाणवलेले वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत सुंदर आखीवरेखीव स्वच्छ रस्ते, सायकलस्वारांसाठी खास मार्ग, जागोजागी सिग्नल्स, मार्गदर्शक साईन्स, सोबर रंगीत विटांच्या इमारती, खिडक्यांना नक्षीदार गॅलरींचे फेन्सिंग. प्रत्येक गॅलरीत रंगीत फुलांनी बहरलेल्या झाडांच्या, वेलींच्या कुंड्या, इमारतीच्या बाहेर फूटपाथच्या शेजारी १०-१२ फूट उंचीवर सुंदर नक्षीकाम वेगवेगळ्या आकाराचे काचेचे दिवे लावलेले. सुंदर निगा राखलेले वृक्ष, त्यांच्या मुळाशी माती, पण ती इकडेतिकडे जाऊ नये म्हणून गोल आकारात सछिद्र आवरणे टाकलेली, रस्त्याच्या कडेला कुठेही उघडे गटार, कचराकुंडी किंवा जाळे, धुळीने माखलेल्या वास्तू अजिबात नजरेस पडत नाही. धूळ नाहीच म्हटलं तरी चालेल. शिवाय आवाजाचे प्रदूषणही नाही. शहरात किंवा महामार्गावर कुठेही धूळ, माती, रेती मागे उडवत जाणारे किंवा मातीचे ढेकळं रस्त्यावर पाडत जाणारे उघडे ट्रक्स दिसत नाहीत. सर्व ट्रक्स बंदिस्त कारसारखे चकाचक. ट्रकवर कंपनीचे लोगो, सिम्बॉलचा मोठ्या प्रमाणावर वापर केलेला दिसला. सर्वत्र स्वच्छता असल्याने एकही डास किंवा माशी नजरेस पडत नाही. संपूर्ण शहरात अधिकाधिक पुरुष, स्त्रिया मुले सायकल चालवताना-धावताना दिसतात. म्हणजे अधिकाधिक लोकांचा कल फिटनेसकडे दिसतो. सायकलस्वारांना खूपच उच्च दर्जा सन्मान असल्याचे जाणवते. त्यांच्यासाठी खास मार्ग आखून ठेवलेत. कुठेही गडबड नाही. सायकलस्वार जात असेल तर त्याला प्रथम प्राधान्य. कारसुद्धा थांबून किंवा धिमी करून सायकलस्वारास प्रथम मार्ग द्यावा, अशी वाहनव्यवस्था. मुख्य रस्त्यावर किंवा आतील गल्ल्यांमध्ये जागोजागी हॉटेल, बार, रेस्तॉरा दिसतात. हॉटेलच्या बाहेर सुंदर फोल्डींग शेड्स आणि त्याच्याखाली फुलांच्या कुंड्या, विविध आकाराच्या देखण्या टेबलखूर्च्या त्यावर बसून पुस्तक वाचन किंवा गप्पा मारत खानपानाचा आनंद घेणारी युरोपियन मंडळी पाहिली की असे वाटते, जीवनाचा खरा आनंद अनुभवत ही मंडळी जगत आहेत.
या शहराचे वैशिष्ट्य असे आहे  की हे समुद्रपातळीच्याही खाली आहे. येथील लोक डच आहेत. पूर्वी त्यांनी हा खास भूभाग तयार करून वस्ती निर्माण केली आहे. संपूर्ण शहरात एक नदी आहे. त्यात नौकाविहार केला तेव्हा संपूर्ण शहराचे दर्शन होते. नदीशेजारी सुंदर तटबंदी, बसायला कलात्मक बाके, त्यावर बसून अनेक मंडळी कोवळ्या उन्हाचा आनंद घेत पुस्तकवाचन, खानपान, गप्पांचा आनंद घेत बसलेली दिसली. नदीशेजारील सर्व इमारती तीनशे ते चारशे वर्षे जुन्या आहेत. प्रसिद्ध चित्रकार रेब्रांटचे घर आहे. आता घरांनी क्रमांक दिलेले आहेत. पूर्वी त्या घरांवर घराच्या मालकाचे व्यवसायाचे चिन्ह असायचे. असेच एक लाल टोपीचे एक शिल्प असलेले घर गाईडने दाखवले तेव्हा गंमत वाटली. त्या घराचा मालक तशी लाल टोपी घालत असे म्हणे. जुन्या इमारती, घरे, चर्च, भव्य प्रासाद, जुले पूल सर्व काही वेल मेंटेन्ड आहेत. अॅमस्टरडॅम शहराच्या आजुबाजूला भरपूर शेती दिसते. तीसुद्धा व्यवस्थित आखीवरेखीव. कुठेही बघा, नीटनेटकेपणा नजरेत भरतो. येथे गायी मोठ्या प्रमाणात आहेत. कुठेही म्हैस हा प्राणी दिसत नाही. गायीच्या दुधाचे पनीर, बटर, चीज यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती येथे होते. तसेच गायी फक्त शेतातच बसलेल्या दिसल्या. त्यांचा चारा विशिष्ट पद्धतीने गोल बंडल करून पॅकेट बनवून शेतात ठेवलेले दिसले. आपल्याकडे जसे गावाकडे काड्यांचा कचरा सर्व गावभर वाऱ्याने पसरलेला दिसतो, तसे इथे नाही. अशाच एका फार्महाऊसला भेट दिली. तेथे चीज बनवण्याची पारंपरिक पद्धत ताज्या चीजची चव चाखून बघितली. एकदम मस्त होतं. नंतरक्लॉग शूजम्हणजे लाकडी बूट कसे बनवतात त्याचे प्रात्यक्षिक बघितले. पूर्वी येथील डच लोक शेतात काम करताना थंडी जास्त असल्याने असे लाकडी बूट वापरत. आज त्यांनी त्या बुटाला त्या देशाची ओळख बनवून टाकले आहे. सुंदर, रंगीत नक्षी असलेले विविध आकारातील असे लाकडी बूट पर्यटक सोविनिअर म्हणून विकत घेतात
नंतर आम्ही येथील प्रसिद्धट्युलिप गार्डनपाहण्यास गेलो. खूप मोठा परिसर खास फुलांचा बगीचा म्हणून राखून ठेवला आहे. असंख्य वेगवेगळ्या रंगांच्या, आकाराच्या, सुगंधी फुलांच्या दर्शनाने सुवासाने आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. या गार्डनमध्ये मोठमोठे वृक्ष, झरणे, हिरवळ, फुलांची गॅलरी, पुतळे, नक्षीदार दिवे, हॉटेल्स, टॉयलेट सर्व सोयी आहेत. फुलांचे ताटवेच्या ताटवे आहेत. पण एकही पर्यटक झाडांना हात लावताना दिसत नाही. सर्वत्र मार्गदर्शक सूचना नकाशे आहेत. येथे प्रसिद्ध विंडमील आहे. तिची संपूर्ण रचना, बांधणी मोठ्या लाकडी खांबांनी केलेली आहे. उंची बहुतेक ४० फूट असावी. असे हे अॅमस्टरडॅम म्हणजे युरोपातील डच लोकांचे अतिशय सुंदर, देखणे कमालीचे शिस्त बाळगणारे, हळुवारपणे जीवनाचा आनंद घेणारे युरोपमधील सर्वात सुंदर शहर असल्याचे जाणवते. त्यानंतर बेल्जीयम या देशातील ब्रुसेल्स येथीलग्रँड प्लेसही जागा पाहण्यासाठी जाताना प्रसिद्ध शिल्प म्हणजेसूकरणारे लहान मूल पाहिले. आजुबाजूला येथील चॉकलेटच्या दुकानांची रेलचेल आहे. त्यानंतर ग्रँड प्लेस येथील प्रसिद्ध चौकात गेलो. चारही बाजूला अप्रतिम भव्य वास्तुकलेचे दर्शन झाले. शिल्प, चित्र, सोनेरी रंगाने मढवलेल्या इमारती पाहून काय बघू आणि काय नाही, डोळ्यात किती साठवू असे होते. यावर तंत्रज्ञानी मार्ग म्हणजे भरपूर फोटो काढून ठेवणे. हे काम पत्नीने चोख बजावले. दरम्यान मी काही धावती रेखाचित्रे केली. प्रत्यक्ष स्थळी रेखाचित्र करण्याचा आनंद काही औरच. त्याच चौकात एक बग्गी उभी होती त्यावर एक चालक सुंदरी पुस्तक वाचण्यात मग्न होती. तिचे रेखाचित्र केले. नंतर पुढे सायंकाळी पॅरिसला पोहोचलो. हॉटेलमध्ये सामान आदी ठेवून भोजन करून पॅरिस अॅट नाईट पाहण्यास बसने बाहेर पडलो
(image google/ no copyright act)
जगातील अतिशय सुंदर नावाजलेले शहर म्हणजे पॅरिस. मोठमोठे रस्ते, कडेला हॉटेल, रेस्तॉरा, बार, इत्यादी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. शहरात फिरताना नक्षीकामाने, मूर्तीकलेने सजलेल्या भव्य ऐतिहासिक इमारती दृष्टीस पडतात त्यावर योग्य पद्धतीने केलेल्या प्रकाशयोजनेमुळे त्यांचे सौंदर्य अधिकच खुलले होते. शेवटी आयफेल टॉवरवर केलेली रोषणाई पाहिली. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेले आयफेल टॉवर. रात्री अकरा वाजता त्यावर खास स्पार्कनिंग लायटींगची योजना अगदी काही क्षणांपुरती केलेली आहे. त्यामुळे हे टॉवर शुभ्र पांढऱ्या हिऱ्याने बनवले असल्याचा भास होतो. दिवसा तपकिरी रंगात दिसणारे टॉवर रात्री सोनेरी काही क्षणापुरते लखलख चमकणाऱ्या शुभ्र पांढऱ्या हिऱ्याप्रमाणे भासते. हे दृश्य कॅमेऱ्यात मनात साठवून निघालो. हॉटेलवर थांबून दुसऱ्या दिवशी पुन्हा संपूर्ण पॅरिस शहरातील प्रसिद्ध स्थळांना भेटी दिल्या. आयफेल टॉवरच्या टॉप फ्लोरवरून संपूर्ण पॅरिस शहराचे विहंगम दृश्य दिसते जे आपण कॅमेऱ्यात मनात भरून घेण्याचा प्रयत्न करीत राहतो, थंडगार वारा उत्साहित करतो. नंतर De La Concord Squre वर बस आली. साईटसिईंग करताना सर्वत्र पोलिस बंदोबस्त दिसला. कारण कळाले की, काल इंग्लंडमधील मॅन्चेस्टर येथे बॉम्बस्फोट झाल्याने सर्वत्र कडक तपासणी करण्यात येत होती. आमच्या बस (ड्रायव्हर) कॅप्टनचे वाहन चालवण्याचे एक आठवड्यातील तास नियमानुसार जास्त भरल्याने त्याला पोलिसांनी दंड केला. यात बराच वेळ गेला. त्या दरम्यान बसच्याच खिडकीतून मी De La Concord Squre चे रेखाचित्र केले बस सुरू झाली.
दिवसभर प्रवास करून मग आम्ही स्वित्झलँडला एन्जल बर्ग या उंच ठिकाणी हिरव्यागार घाटातून प्रवास करत पोहोचलो. संपूर्ण युरोप उत्तर ध्रुवाच्या जवळ असल्याने येथे सूर्य खूप उशिरा म्हणजे रात्री .३०च्या आसपास मावळतो. आपल्याला खूपच गंमत वाटते. त्यामुळे सायंकाळी एन्जलबर्गला सामसूम होती. छोटंसं हिलस्टेशन रात्री हॉटेलात मुक्काम करून सकाळी आम्ही सर्व मंडळी टिटलीस पर्वतावर केबल कारने पोहोचलो. आधी हिरवेगार डोंगर मग पुढे वर वर जाताना बर्फाने आच्छादित पांढरे शुभ्र दिसू लागले. काही स्थानिक मंडळी आईस स्केटिंग करताना दिसली. शिखरावर पोहोचलो तेव्हा शून्य डिग्री तापमान होतं. सर्वत्र बर्फच बर्फ पसरलेली शिखरे मागे निळेशार आकाश. दुसरे काही नाही. जणू स्वर्गातच असल्याचा भास निर्माण करणारे मायावी दृश्य. बर्फ फेकून मारणे, फोटो काढणे, आदी मजा लुटून नंतर तिथेच आम्ही लेव्हल एकवर खिडकीतून बर्फाचा डोंगर पाहत भारतीय भोजन घेतले. त्याचा आनंद अवर्णनीय असाच आहे. नंतर दुपारी थोडा प्रवास करून आम्ही ऱ्र्हिन धबधबा पाहायला गेलो. हा धबधबा युरोपमधील सर्वात मोठा धबधबा असून झुरीचच्या हद्दीवर आहे. तिथे भरपूर गर्दी होती पण अतिशय सुंदर व्यवस्था. कुठेही गडबड, गोंधळ नाही. शिस्त, शांतता असल्याने लवकरच बोटीने त्या धबधब्याच्या मध्यभागी एका पॉईंटवर गेलो. स्वच्छ फेसाळलेले पाणी, पांढरेशुभ्र दिसत होते. नंतर स्वित्झर्लंड येथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी प्रवास करून सायंकाळी इटली येथील पडावा येथे पोहोचलो. हॉटेल हायवेच्या जवळ होते. त्याच्याच पलिकडे रेल्वे ट्रॅकसुद्धा होता. बाजूला हिरवीगार शेती, लांबमागे निळेशार डोंगर दिसत होते. रात्रीचे .३० वाजले तरी आभाळसूर्यास्ताने केशरी झाले होते. भोजन मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी व्हेनिस शहर बघण्यास गेलो. प्रथम बसने जेट्टीवर तेथूनवापारँतोम्हणजे लहान बोटीने (३०-४० लोकांची) व्हेनिस शहराच्या किनाऱ्यावर पोहोचलो.
कबुतरं, कालवे आणि कलाप्रेमींसाठी प्रसिद्ध असलेले हे शहर एका बेटावर वसलेले आहे. जमीन मऊ असल्याने या शहरातील सर्वच इमारतींत लाकडाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. वजन कमी ठेवण्याचा प्रयत्न, अनेक भव्य इमारती, वस्तुसंग्रहालय, चर्च, बेसिलिका, बेट टॉवर, कॅथेड्रल, न्यायालय, जुना तुरुंग अशा अनेक इमारतींमध्ये शिल्पकला, चित्रकला, वास्तुशिल्पाचा कौशल्यपूर्ण वापर केलेला दिसला. शहरातील कालव्यातून फिरण्यासाठी लहान होडीचा वापर होतो. त्यालाच गंडोला म्हणतात. ‘ ग्रेट गॅमलरया हिन्दी चित्रपटातील अमिताभ झीनतवर चित्रीत झालेलं प्रसिद्ध गाणंदो लब्जो की है ये कहानीहे याच गंडोलामधील आहे. त्यामुळे या गंडोलामधून जोडीने फिरताना खूपच रोमँटिक वाटतं. तेथे काचेच्या वस्तू बनविणारी फॅक्टरी प्रात्यक्षिके पाहिली. सोबतच्या काही लोकांचे बघून होईस्तोवर मी गंडोल्याचे एक शिघ्र रेखाटन केले. शहरातील कालव्यांवर जागोजागी लहान पूल बांधलेले आहेत. त्यात एक बंदिस्त पूल आहे त्याचे नाव आहेब्रिज ऑफ साय त्याला दोन खिडक्या आहेत. कैद्यांना फाशी किंवा ठार मारण्याची शिक्षा झाली की त्या ठिकाणी या बंदिस्त पूलावरून नेण्यात येई त्या खिडकीत क्षणभर उभे राहून बाहेरचे सुंदर जग बघण्याची शेवटची संधी दिली जाई. त्या दोन खिडक्या असलेला पूल माझ्या रेखाटनात दिसत आहे. असो, नंतर आम्ही रोमला निघालो. वाटेत फ्लॉरेन्स येथील मायकल अँजेलो पॉईंटवर थांबलो. तेथे डेव्हीड या प्रसिद्ध शिल्पाची हुबेहूब प्रतिकृती स्थापित केली आहे.
या जागेवरून संपूर्ण फ्लॉरेन्स शहराचे दर्शन होते. युरोपमधील सर्वच प्रसिद्ध शहरांमध्ये नद्या कालव्यांचा खूपच सुंदर उपयोग करून घेतल्याचे जाणवते. नंतर पुढील प्रवासात रोम इटली येथील प्रसिद्ध ठिकाणे पाहिली. पिसा येथील जगप्रसिद्ध झुलता मनोराझुलता मनोरा फक्त म्हणतात त्यालातो झुलत नाही. लहानपणी तसे वाटे. तो बांधत असताना तीन मजले बांधून झाल्यावर एका बाजूला झुकला असे म्हणतात, मग पुढे तसाच तिरपा बांधला की काय कोण जाणे, गाईडकडे याचे उत्तर नव्हते. बाहेरून मोठ्या किल्ल्यासारखी तटबंदी असून आत विस्तीर्ण मोकळा परिसर आहे. त्यात बेसिलिका, कॅथेड्रल हा प्रसिद्ध झुकलेला मनोरा आहे. बाजूला वस्तुसंग्रहालय, आर्ट गॅलरी एक लहान गाव आहे. त्यात हॉटेल, रेस्ताँरा, बार इत्यादी भरपूर आहेत. फिरायला घोड्याची बग्गी मिळते.
दुसऱ्या दिवशी जगातील सर्वात लहान देश म्हणजे व्हॅटिकन सिटीला भेट दिली. अत्यंत कडक नियम सर्व तपासण्या झाल्यावर प्रवेश मिळाला. सेंट पीटर चर्च पाहिले. चर्चच्या समोर विस्तीर्ण गोलाकार परिसर आहे. मध्ये मोकळी जागा असून त्यात मध्यभागी एक स्तंभ असून शेजारी दोन कलात्मक कारंजे आहेत. गोलाकार परिसर भव्य संगमरवरी खांबांनी वेढलेला असून समोर भव्य चर्च आहे. याचे बांधकाम रेनासन्स काळातील असून याचे वास्तुशिल्पकार म्हणून जगप्रसिद्ध चित्र शिल्पकार मायकल अँजेलो याने काम बघितले. चर्चमध्ये त्यानेच मार्बलमध्ये घडविलेलेपिएताहे शिल्प ठेवले आहे. मेरीच्या मांडीवर येशूचे गतप्राण शरीर पडलेले आहे. पण तिच्या चेहऱ्यावर दु:खाचा भाव नसून तिला त्याच्या दिव्य आत्म्याची कल्पना असल्याने शांत भाव आहेत. चर्चमध्ये उंच छतापर्यंत अनेक कोरीव बलशाली संगमरवरी खांब असून जमिनीवर अनेक विविध रंगाच्या संगमरवरी दगडांचा वापर करून धार्मिक चिन्ह सुंदर नक्षीकाम केलेले आढळते. छतावर रंगीत दगडांचा वापर करून मोझेक पद्धतीने बायबलमधील अनेक प्रसंग कलात्मकरित्या साकारलेले आहेत. एवढ्या उंच छतावर मोठमोठ्या कलाकृती कशा निर्माण केल्या असतील या विचाराने पर्यटक अचंबित झाल्याशिवाय राहत नाहीत. सर्व कलाकृती पाहून बाहेर आल्यावर तेथे समोर असलेल्या सेंट पीटर यांच्या पुतळ्याचे एक शिघ्र रेखाटन मी केले नंतर स्वप्नगरी युरोपचा निरोप घेऊन सायंकाळी रोम ते सकाळी आबुदाबी तेथून दुपारपर्यंत मुंबईला पोहोचलो. घरी जाण्यासाठी कॅब केली. सिग्नलवर कॅबच्या ड्रायव्हरने दरवाजा उघडून रस्त्यावर माव्याची पिंक थुंकल्याचे पाहून मी खाडकन जागा झालो आपण मायदेशी परतल्याची खात्री पटली.

-          सुभाष गोंधळे, वसई  







Saturday 20 May 2017

WHY SANSKRIT- HINDI SIGNIFICANT, HOW TO PROMOTE IT?



By Dr. Shiv Kumar Ojha original version in Hindi. 

Translation by: Pankaja JK. 

The book is my first complete book translation assignment and whole process was a knowledgeable journey. The book has many features other than being a language book. It highlights Indian culture and how everything in the Universe is meticulously studied by our ancient gurus and assembled in various books. Be it cosmological, astronomical, linguistics, medicinal or spiritual knowledge, we have information on every aspect studied careful and preserved through generation, till date.

Speaking about language is not only interesting but studying it in depth, applying it in regular use and admiring its beauty is a fabulous experience.

Sanskrit is the base of all Indian languages, also known as Devanagari languages. This book highlights on the scientific nature of Sanskrit-Hindi language. Unlike English where consonants and vowels are place together and in haphazard manner. Indian languages have a proper sequence, arrangement of consonants and vowels as separate entities and therefore understand these languages and remembering them are easier than any other widely used foreign language. There is proper way of pronunciation and writing. All these aspects are introduced and explained in this book. 

Interestingly, the author Dr. Ojha himself communicated in English throughout his professional period, as he is the Ex- IIT professor IN Department of Aerospace Engineering, Mumbai. He has also travelled worldwide. But still he is rooted in our culture and embraces Indian culture and language. Therefore we see that every at the age of more 83 years, he studies Indian culture and language. He is also the author of 11 more books based on Indian culture. I am proud he trusted me to translate this very important book for him. Even though there were times when we disagreed on some points of words to be used or expressions, and discussed it for days together, ultimately agreement was possible and this book was published with his sole permission and approval. 

Those people who are interested in Indian culture, Indian language calligraphy and Fine Arts should once go through this book to have an idea of vastness and beauty of Indian language. The book is available on demand and it is worth to keep it in valuable treasure of your books at home or in office. It will not only benefit you as an individual but also help impart rich Indian culture knowledge to your friends and family. In this modern and advanced world where Western culture is highly over-shadowing India’s rich culture and heritage, this is one opportunity for us to preserve it as our personal social responsibility.

by Pankaja JK.