शिर्षकातील द्वैतता आत्मचिंतनाला आमंत्रित करते. ज्ञान ओळख आणि आठवणींशी चित्रकाराला त्याच्या संबंधांवरील प्रश्नांना अधोरेखित करते. चित्रकार जे गहाळ झाले आहे ते शोधण्यात किंवा अपूर्ण सत्यांना समजून घेत असताना आपल्याला समजण्याची आवश्यकता असते. तरीही स्वताचा असलेला अपूर्णतचा स्वभाव आपल्याला प्रश्न विचारायला लावतात की, कधीही पूर्ण समज मिळविणे शक्य आहे का, किंवा आपण अनुपस्थिती आणि सत्य यामधील त्या अंतरातच अडकलेले आहोत का? हि संकल्पना तत्वज्ञान, साहित्य आणि कला यामध्ये वारंवार अन्वेषित केली जाते. परंतु दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर बदलेल्या जागातिक पटलात या संकल्पनेने साहित्य आणि कलेत अनेक महत्त्वाची यात परिवर्तने घडवून आणली.
![]() |
Artist: Genesh Tartare |
गहन आणि व्यापक भावनिक परिणामांनी चित्रकलेत नविन वळणे तयार झाली चित्रांमधून नैतिकता आणि अस्तित्वाच्या अर्थाचे प्रश्न निर्माण केले. चित्रकारांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग स्वनिर्मित संशोधनासाठी प्रामुख्याने केला. अशाच समांतर धाग्यांनी जग प्रवाहित झालेले दिसते. भावनिक आस्तित्व प्रतिबिंबित करण्यासाठी कृती आणि माध्यम ही स्वच्छंदी झाली या बदलाचा परिणाम निर्मितीवर कायमचा झाला चित्र साहित्यामध्ये अपूर्ण सत्याशी संघर्ष हा एक महत्वाचा विषय असतो ज्यात पात्रे अस्पष्टतेच्या अभावात अर्थ शोधतात अशा कार्यामध्ये सत्य शोधणे हे केवळ एक अंतिम सत्य उलगडण्याबद्दल नसून मानव अनुभवांच्या मर्यादा आणि तुकड्या मधील अंतर समजून घेण्याबद्दल असतं. अनेक कलाकारांनी आणि साहित्यीकांनी त्यांच्या कलाकृतीमधून मानवी अस्तित्वाच्या अपूर्णतेवर अणि ज्ञानाच्या मर्यादेवर प्रकाश टाकला आहे. कवी ग्रेस यांच्या कवितांमधून अस्तित्वाच्या जटिलतेवर आणि ज्ञानाच्या मर्यादेवर संदर्भित दिसतात. त्यांच्या संकल्पना आपल्याला नम्रता, आश्चर्य आणि अस्तित्वाच्या गूढतेचा स्विकार करायला लावतात.
डॉ गणेश तरतरे यांच्या चारकोल माध्यमातील चित्रे/चित्रात "जे शिल्लक नाही" हे अनुपस्थितीचे प्रतिनिधित्व आहे, अदृश्य झालेल्या अनुभवांमुळे, हरवलेल्या संभाव्यतेमुळे आणि स्मृतीच्या विघटनामुळे तयार झालेली नकारात्मक जागा आहे. जे होऊ शकले असते यांचे भूतकालीन अवयव आहेत. चारकोलच्या पावडरने घासून तयार केलेला आकारात विसरलेल्या उन्हाळ्याचा काल्पनिक सुगंध आहे, तसेच तो आकार आस्तित्वाच्या क्षणभंगुरतेच्या स्वभावाचेही अस्तित्व दर्शवितो. न बोललेले शब्द अहेत जे त्यांच्या चेतनेच्या शांत कोपऱ्यात फिरत असतात. आपल्या जीवनाचा आपल्या संभाव्यतेचा मोठा भाग कायमस्वरूपी अप्रकट आहे याची जाणीव आणि 'नाही' चा एक विशाल शांत महासागर आहे त्यावरील चारकोलच्या रेषा आणि त्यांनी तयार झालेले आकार हे अपूर्ण सत्याच्या वास्तवाचे तुकड्या तुकड्यांत असलेले आरसे आहेत. जे आपल्या अनुभवाच्या पुर्वग्रहांतून आणि स्वताच्या स्वभावाच्या समजूतदारपणाच्या मर्यादामधून गाळून प्रकट झाल्या आहेत.
चित्रातील त्यांची कृती म्हणजे भरीव आकार भरणे त्यांवर रेषा काढणे आणि त्या पुन्हा पुन्हा खोडणे, घासणे या मुळे जे आकार व ज्या कडा तयार होतात त्या त्यांच्या चित्र निर्मितीतील अमुर्ततेची सोनेरी किनार आहे जी उत्तर आधुनिक अमुर्त चित्र प्रकारचे प्रतिनिधीत्व करताना दिसते. प्रत्येक चित्र प्रत्येक रेषा आकार हे तथ्यांची काळजी पूर्वक केलेली निवड आहेत ज्यामुळे संदर्भ, बारकावे, मोठे माग हे चित्राच्या छोटया- पृष्ठभागाखाली गाडले जातात जणू अर्ध सत्य आणि व्याक्तिनिष्ठ व्याख्यांच्या चक्रव्यूहात फिरत आहोत. गणेश तरतरे हे त्यांच्या अनुभवाचे सार पकडण्याचा इच्छेने प्रेरित झालेले चित्रकार आहेत प्रत्येक आकार प्रत्येक रेषा आणि पुसट पृष्ठभाग व कोरा पृष्ठभाग हा अनंततेचे मर्यादिततेत रूपांतर आहे, ते "जे शिल्लक नाही" ची पोकळी "अपूर्ण सत्या" च्या तुकड्यानी भरण्याचा प्रयत्न करतात हे जाणून की त्यांची निर्मिती ते प्रतिनिधीत्व करू इच्छित असलेल्या वास्तवाची केवळ एक छाया आहे.
-स्मिता निलेश