Thursday, 26 March 2020

*वर्तमान परिस्थितीमुळे व्हायरल होत असलेला चित्रकार*


एडवर्ड हॉपर.
सहा दिवसांपूर्वी न्यूयॉर्क टाइम्समध्ये एका जून्या अमेरिकन चित्रकारावरती एक लेख लिहिला गेला कारण जगभरातून सोशल मीडियावरती हा चित्रकार सध्या व्हायरल होतोय. 



आज जगभरातल्या सर्व महत्त्वाच्या देशांनी स्वतःला बंद करून घेतलंय. भविष्याकडे जीव काढून पळणाऱ्या माणसांना एकाएकी ब्रेक लावल्यासारखं थांबवून टाकलंय.  माणसं घरात बसून आहेत , एकमेकांशी बोलत आहेत. पण असं ते किती दिवस वागतील.  चार दिवस एकमेकांशी बोलतील , आठवडाभर बोलतील पण त्यानंतर सर्व विषय संपल्यावर एक अशी वेळ येईल की हा संवाद थांबेल.  त्यांना परत एकदा एकटं असावसं वाटेल. कोणाशीही कशाहीबद्दल काहीही बोलावं वाटणार नाही कारण आपल्या शहरी माणसांना एकमेकांशी बोलणं इतकं सवयीचं उरलं नाहीये. आपल्या रोजच्या जगण्यात घरातल्याच लोकांशी आपण किती काळ संवाद साधतो याबद्दलच शंका आहे. हा एकटेपणा आपल्या शहरी जगण्याचा स्थायीभाव होत चाललाय. 
जगभरातल्या या विलगीकरणाच्या लाटेमध्ये मागच्या काही दिवसांपासून एक अमेरिकन चित्रकार व्हायरल होतोय. लोकांना त्याची परत एकदा आठवण झाली आहे.  1882 ते 1967 या त्याच्या कार्यकाळातच त्याने आपल्या वर्तमान जगण्याची दिनचर्या मांडून ठेवली होती ‌.  या चित्रकाराचं नाव आहे एडवर्ड हॉपर. 



             हा एडवर्ड हॉपर शहराची चित्रं काढायचा. शहरं , शहरातली माणसं , इथल्या इमारती , रस्ते , पेट्रोल पंप्स , छोटी-मोठी हॉटेल्स.  असे साधेसुधे वाटणारे , रोजच्या जगण्यातले , आपल्या आजूबाजूला दिसणारे चित्रविषय. हॉपरच्या कुठल्याही चित्रातला , कुठलाही माणूस , कुठल्याही ठोस एक्सप्रेशनशिवाय चित्रित केलेला असतो. तो संमिश्र भावना असलेला चेहरा आणि जोडीने त्याने मांडलेला अवकाश आपल्या आतलं असं काहीतरी हलवून जातात की मनात येणाऱ्या सर्व भावना काही काळासाठी गोठून जातात. वैयक्तिकदृष्ट्या एडवर्ड हॉपरची चित्र मला गायतोंडेंच्या चित्रानुभवाशी नातं सांगणारी वाटतात. एकाग्रतेने पाहत असल्यास गायतोंडेंची चित्र ही तुम्हाला तुमच्या आदिम शांततेशी नेऊन पोहोचवतात ,  त्याचपद्धतीने हॉपरदेखील त्या आदिम एकटेपणाच्या भावनेशी नातं जोडतो.

इंग्रजीमध्ये ecstasy असा एक शब्द आहे. या शब्दामागे अभिप्रेत असणारा ‘ आनंद ‘ आपण कुठल्याही थुकरट , रोजच्या जगण्यातल्या साध्यासुध्या अनुभवाशी जोडू शकत नाही. ह्या शब्दातून अभिप्रेत असणारा ‘ आनंद ' हा दैवी आहे. तो मांडण्याजोगा नाही. हॉपरच्या चित्रांमधूनही अशीच एक भावना तयार होते. ती शब्दात मांडल्या जाऊ शकत नाही. त्याच्या चित्रातून दिसणारा एकटेपणा हा समाजात रोज वावरताना आपल्याला एकमेकांप्रती असणारा तुसडेपणा नाही किंवा आपल्याला सभोवतालातून वेगळा करणारा एकटेपणा नाही. त्याच्या चित्रातला हा एकांत तुमच्या आतला आहे , आदिम आहे , मूळ आहे. हा एकांत तुमच्या जन्मापासून तुम्ही तुमच्या आत वाढवलेला आहे. रोजच्या जगण्यात हा एकांत जाणवत नाही ,  तो अवचित बाहेर येतो आणि आपल्या एकटं असण्याची आपल्याला करकरीत जाणीव करून देतो. 

आपल्या आयुष्यात असे तुरळक क्षण येतात जिथे आपल्याला खरोखरी मनापासून वाटतं की आपण पूर्ण एकटे आहोत. एडवर्ड हॉपर मला त्या अवचित उगवणाऱ्या क्षणांना मूर्त रूप देणारा चित्रकार वाटतो. 















- Charudatt Pande

   Artist/ Writer

  Pune - 2020



image google no copyright

No comments:

Post a Comment

Thanks for comment JK