निसर्गाशी असलेले बालपणापासूनचे नाते आणि त्यात रमणारे मन 'मन पाखरू' या 'शीर्षक' कवितेत दिसून येते.
कधी उंच झुल्यावर,
मन अथांग सागर…
असे भुइवर आता जाई गगनी सत्वर
उंडरते जेव्हा तेव्हा
वार भरलेले वासरु.
असेच 'जीवनसागर', 'पाणी', 'जगणे', या कवितांतील जल, फुलं, वनराई, प्राणीमात्र यांचा आपल्या भावनिक आणि भौतिक जीवनावर होणारा प्रभाव व्यक्त करतात.
निसर्गाच्या रम्य वातावरणासोबत कवींना रोजच्या जगण्यासाठी केलेल्या मानवी संघर्षाचाही प्रत्यय आलेला आहे. हा संघर्ष फक्त त्यांच्या निसर्गरम्य आबलोली गावापुरता मर्यादीत नसून शहरातही याचा अनुभव कवी विलास यांना आला आहे, कारण ते समाज कार्यात सक्रीय आहेत आणि त्यांनी आपल्या बांधवांना गरिबी, दारिद्र्य आणि दीन जीवनातून मुक्त करण्याचा ध्यास घेतला आहे, त्यासाठी ते गोरगरीब समाजात वावरत असतात. पण कवींना एक गोष्ट जाणविली आहे कि, जगण्यासाठी करीत असलेला संघर्ष, बिकट परीस्थिती, बेआसरा असलेल्या आशा, या सर्वांवर मात करता येते. आणि ती मात त्यांनी कवितांतून स्पष्ट केली आहे. ही मात करताना आशेचा सूर्य मनात तळपत राह्तो. 'आशावाद' सर्व दुखी आणि निराश भावना आणि विचारांना घालविण्याचा जालीम उपाय म्हणून कवितांमधून प्रकट होतो. 'नवरी' या कवितेतील निरागस मुलीचा आपल्या गरीब आईला केलेला प्रश्न 'माय कधी ग आपण… चांगल्या घरात जाणार?' तिच्यासाठी तिच्या मातेची आशा कि तिच्या मुलीला हे सुख चांगल्या घरात लग्न केल्यावरच प्राप्त होईल आणि त्याबरोबरच सध्यास्थितितील सारी सत्ये, जशी, गरीब परिस्थिती, भीक मागायची लाचारी आणि तोडक्या-मोडक्या घरातही चांगल्या भविष्याची आशा जोपासण्याची हिम्मत सामोरी येते. आशावादी युवकांना 'पाखरे' असे संबोधून कवी 'घरट्यासाठी' या कवितेत नव- युवकांना नवी घरटी मिळाल्यावर झालेला आनंद व्यक्त करतात. उमेदीं अजून फुलून येतात व ठाम होतात. ह्या कवितांनी आपल्यालाही प्रेरणा मिळते, जेव्हा आपण वाचतो:
'नव्या उमेदीन मारली भरारी
नव्या घरट्याकडे
जेव्हा मिळाले पाचूचे दाणे
रमले सारी आनंदाने नव्या घरट्यात"
किंवा
जीवनप्रवाहात तुम्ही
द्या स्वतःला झोकून
ठेवू नका झाकून आणि
बघू नका वाकून….
सांसारिक सुख, प्रेम, ऋणानुबंध जपताना अनुभवलेले आठवणीतील कित्येक क्षण सुरेख शब्दरूपात मांडून कवी वाचकाला मुग्ध करतात, भारावून टाकतात. दुखी क्षणांत आनंदाच्या आठवणी करून देतात. 'प्रवाह', 'संसार', 'रुपगर्वित' ह्या अशाच काही कविता आहेत.
कवीच्या जीवनातील कडू गोड अनुभव, व्यक्तिगत सामोरी अनुभवलेले प्रसंग आणि लोकांच्या स्वभावांचे झालेले दर्शन मांडतात. 'मन मनातले', 'अंतरी' ह्या कविता आत्मबोधक वाटतात. काही कविता सुरेख शब्दरूपात असल्या तरी त्या कुणाला उद्देशून आहेत ते स्पष्ट होत नाही, तरीही त्या वाचनीय आहेत. मला आवडलेली त्यांची 'माता' या कवितेचे वाचन करताना कवी सुर्यकांत खांडेकर यांची कविता 'त्या फुलांच्या गंध कोषी सांग तू आहेस का…" आठवते, जी निरंकाराला उद्देशून, त्याच्या सर्वव्यापी असण्याचा पुरावा देते. तसेच या कवितेतून आईच्या विविधी रूपांचे आणि सहनशील, प्रेमळ, सामर्थ्यवान स्वभावाचे दर्शन होते.
…कधी कोमल कधी सोज्वळ
रूप दिसे तुझे मनमोहक
चाण्डीकाच्या रुपी तुझ्या
विषारी विकार थरारले…
एकूणच 'मन पाखरू' कवितांचा संग्रह सर्वतोपरीने आसमंतात भरारी घेणाऱ्या पाखरासारखा आहे. कधी हे पाखरू एकाग्रतेने, शांतचित्ताने आपले पंख न फडकवीत आसमंतात विहार करते आणि कधी आपली उद्वेगना स्पष्ट करण्यासाठी पंखांचे आवाज करून चित्कारत झेप घेते.
कवी विलास कदम यांच्या कविता पहिल्यांदा प्रकाशित झाल्या आहेत, ही त्यांची पहिली झेप आहे आणि त्यात ते सफल झाले आहेत. ह्या साहित्यप्रकारात त्यांची वाटचाल अशीच होत राहो आणि त्यांनी स्वतःच्या विचारांना अजून कसून आपले विचार काव्य रुपात प्रस्तुत करावे या साठी माझ्या त्यांना अनेक शुभेच्छा.
मुंबई
दिनांक: २४ मार्च २०१३
"मन पाखरू" -विलास गणपत कदम.
No comments:
Post a Comment
Thanks for comment JK